ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
कल्याण (प्रतिनिधी):
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील चिकनीपाडा येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा दिवसांची नवजात मुलगी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने स्थानिक महिलेच्या सतर्कतेमुळे या चिमुकलीचा जीव वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात राहणाऱ्या पूजा दाबेकर या सकाळी कचरा टाकण्यासाठी गेल्या असता त्यांना एका पिशवीत नवजात मुलगी आढळून आली. त्या वेळी काही भटके कुत्रे बाळाच्या आजूबाजूला फिरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संभाव्य धोका ओळखून पूजा दाबेकर यांनी तातडीने मुलीला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले आणि घटनेची माहिती कोळसेवाडी पोलिसांना दिली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नवजात मुलीला उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले असून काही दिवस तिला वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
या घटनेप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नवजात मुलीला अशा अवस्थेत टाकून जाणाऱ्या व्यक्तींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून पूजा दाबेकर यांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.





