ज्वाला न्यूज
अहेरी:
अहेरी नगर पंचायतीचे कर निर्धारण अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण अहेरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. अब्बनपल्ली फाट्याजवळ घडलेल्या या घटनेने प्रशासकीय वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कर निर्धारण अधिकारी वैभव पांढरे हे वॉकिंगवर असताना दबा धरून बसलेल्यानी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पांढरे गंभीर जखमी झाले आहेत.
कायदेशीर कारवाई:
या गंभीर घटनेची दखल घेत अहेरी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चौघांविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. कंकडालवार याला पोलिसांनी शिताफीने अटक केली. आज त्याला चामोर्शी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फरार आरोपींचा शोध सुरू:
या हल्ल्यात सामील असलेले अन्य तीन आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे अहेरीत सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





