ज्वाला न्यूज
देवरी (गोंदिया) :
गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे आयोजित ‘शिंदेसेने’च्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. आपल्या आक्रमक शैलीसाठी परिचित असलेल्या बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना थेट इशारा दिला की, “जर आपला मंत्रीही चुकत असेल, तर त्याची मुळीच पर्वा करू नका, तर त्याला ‘ठोकून काढा’.”
काय म्हणाले बच्चू कडू?
मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कडू यांनी स्पष्ट केले की, कोणाचीही चूक असेल तर ती वेळेत निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. चुकीच्या गोष्टींना अजिबात थारा देऊ नका किंवा त्यांना माफ करू नका, असे आवाहन त्यांनी केले. सत्ताधारी गटात असूनही त्यांनी केलेले हे विधान उपस्थित सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले.
‘एकनाथ शिंदे एकमेव मर्द’
यावेळी बोलताना त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेवरही भाष्य केले. अनेक पक्षांत जाण्याचे मार्ग खुले असताना आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय का घेतला, यावर बोलताना कडू म्हणाले की, “मी एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याचा पर्याय निवडला कारण ते ‘एकमेव मर्द’ आहेत.”
बच्चू कडू यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून, शिंदे गटातील मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे.





