ज्वाला न्यूज
मुल:
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कर्णकर्कश आवाजात तसेच नियमबाह्य पद्धतीने डीजे वाजविणाऱ्यांविरोधात मूल पोलिसांनी धडक कारवाई केली. २२ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल २६ लाख १० हजार रुपयांचा डीजे साहित्य, जनरेटर व वाहने जप्त करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक विजय राठोड व त्यांचे पथक गणेश विसर्जन बंदोबस्तात असताना आलेवाही व नवेगाव आलेवाही येथे विनापरवाना मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ध्वनीमापक यंत्राद्वारे आवाजाची तपासणी केली.
तपासणीदरम्यान आलेवाही येथे ७७.०३ डेसिबल, तर नवेगाव आलेवाही येथे ७३.५० डेसिबल इतकी ध्वनीची तीव्रता नोंदविण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, ही ध्वनीची पातळी विहित मर्यादेपेक्षा अधिक आढळली.
या प्रकरणी जय वाल्मिकी गणेश मंडळ, आलेवाही आणि उज्ज्वल ज्योत गणेश मंडळ, नवेगाव आलेवाही येथील आयोजकांसह डीजे मालक/ऑपरेटर आणि वाहन चालकांविरुद्ध अप. क्र. ६८२/२०२६ व ६८३/२०२६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दोन्ही प्रकरणांमध्ये कलम २२३ भारतीय न्याय संहिता तसेच कलम ३८ व १३६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
गणेश विसर्जनाच्या काळात ध्वनीप्रदूषणासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.





