ज्वाला न्यूज
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने नागरिकांचे हरवलेले व चोरीला गेलेले तब्बल 11 मोबाईल फोन शोधून काढत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कुरखेडा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हे मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांचा शोध घेतला.
शोधून काढलेले सर्व मोबाईल संबंधित नागरिकांना पोलीस ठाणे कुरखेडा येथे विधिवत सुपूर्द करण्यात आले. अनेक नागरिकांनी आपले मौल्यवान मोबाईल परत मिळाल्याने आनंद व्यक्त करत गडचिरोली पोलीस दलाचे आणि कुरखेडा पोलिसांचे आभार मानले.
गडचिरोली पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, जेणेकरून तांत्रिक माध्यमातून मोबाईलचा शोध घेणे सुलभ होईल. ही कारवाई नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे.





