ज्वाला न्यूज
कुरखेडा, दि. ०८ जून २०२६ : समस्त आदिवासी समाज संघटना तालुका कुरखेडा, आरमोरी, देसाईगंज, कोरची व धानोरा तसेच आमदार रामदासजी मसराम यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेला “उलगुलान व तीव्र निषेध मोर्चा” मोठ्या उत्साहात व अभूतपूर्व जनसमुदायाच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला.
या मोर्चामध्ये आदिवासी समाजातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. आदिवासी समाजाच्या अस्मिता, ओळख, हक्क आणि संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चादरम्यान विविध मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यात आले. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आदिवासी समाजाची एकता, संघटनशक्ती आणि हक्कांबाबतची जागरूकता या मोर्चातून प्रकर्षाने दिसून आली.
यावेळी उपस्थितांनी “जय आदिवासी, जय जोहार, जय संविधान” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.


जय आदिवासी || जय जोहार || जय संविधान





